रायगड - निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यात झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक रायगडात दाखल झाले आहे. अलिबाग तालुक्यातील आक्षी, नागाव सताड बंदर, चौल येथील काटकर, आळी याठिकाणी ते पाहणी करणार आहेत. केंद्रीय पथकात सहा अधिकारी असून ते पाहणी केल्यानंतर त्याचा अहवाल केंद्राला सादर करणार आहेत.
वादळामुळे रायगडचे नुकसान -
गेल्या ३ जूनला निसर्ग चक्रीवादळ अलिबागजवळील मुरुड समुद्रकिनारी धडकले होते. या वादळामुळे रायगड जिल्ह्याचे प्रचंड नुकसान झाले. नारळी-पोफळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. तसेच अनेकांच्या घरावरची कौले, पत्रे उडाली. मातींच्या घरांची पडझड झाली. झाडांसह विद्युत खांबांची पडझड झाल्याने या भागातील विद्युतपुरवठा देखील खंडीत झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या भागाची पाहणी केली. त्यावेळी रायगड जिल्ह्याला मुख्यमंत्र्यांनी १०० कोटी रुपयांच्या तातडीची मदत दिली. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील रायगडमधील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी राज्य सरकार आवश्यक ती मदत करत आहे. मात्र, केंद्राने देखील कोकणातील नुकसाग्रस्त भागाला मदत द्यावी, असे म्हटले होते. तसेच खासदार सुनील तटकरे यांनी देखील केंद्राने मदत देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता केंद्रीय पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे.