रायगड - हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 348वा राज्याभिषेक सोहळा आज (23 जून) तिथीप्रमाणे किल्ले रायगडावर मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. कोरोनाच्या पार्शवभूमीवर यावेळी मोजक्याच लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी होती. दरम्यान, या सोहळ्याला राज्यपालांकडून 5 लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे.
शिवरायांच्या जयघोषाने वातावरण शिवमय
किल्ले रायगडावर सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर शिवपालखीचे राजदरबारात आगमन झाले. त्यानंतर प्रकाशबुवा जंगम यांच्या हस्ते शास्त्रोक्त पूजन झाले. शिवरायांच्या पुतळ्याला मंत्रोच्चारात 5 नद्यांचे पाणी, पंचामृत आणि नाण्यांचा अभिषेक घालण्यात आला. यावेळी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी' असा जयघोष करण्यात आला. सामूहिक आरतीनंतर राजदरबार ते शिवसमाधी अशा पालखी मिरवणुकीने सोहळ्याची सांगता झाली. यावेळी मेघडंबरी तसेच होळीच्या माळावरील शिवपुतळ्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. भगवे झेंडे, पताका आणि शिवरायांचा जयघोष यामुळे वातावरण शिवमय झाले होते.
राज्यपालांकडून 5 लाखाची देणगी
तिथीनुसार शिवराज्याभिषेकासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 5 लाखांची देणगी दिली. तसेच, या सोहळ्याला उपस्थित राहण्याची इच्छाही त्यांनी प्रदर्शित केल्याचे समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी सांगितले.
350वा शिवराज्याभिषेक होणार दमदार
यंदाचा 348वा शिवराज्याभिषेक आहे. कोरोनामुळे साध्या पध्दतीने, मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडला. मात्र, 350वा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या स्वरूपात साजरा करण्यात येणार असल्याचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितले.
हेही वाचा - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला एनसीबीकडून अटक