रायगड - गणेशोत्सव साजरा करा पण त्याचबरोबर आरोग्याचीही योग्य काळजी घेत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी केले आहे. तसेच, शासनाने कोविड 19 बाबत जाहीर केलेल्या नियमांचे पालन करण्याचेही आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यलयात अभिनेते मोहन जोशी हे आपल्या काही कामानिमित्त आले होते. यावेळी आरोग्याची काळजी घेत सण साजरा करण्याबाबत कोकणवासीयांना आवाहन केले. मी रायगडचा रहिवासी असून कोकणवासियांबाबत मला अतीशय प्रेम आहे. सर्व कोकणवासीय हे आपल्या आरोग्याची उत्तम काळजी घेत असून त्यामुळे कोविडचा प्रादुर्भाव हा कमी आहे. शासनाने दिलेल्या नियमांचे ते पालन करीत आहेत. ऑगस्टमध्ये आपल्या सगळ्याचा लाडका बाप्पाचे आगमन होत आहे. त्यामुळे मुंबईतून चाकरमानी हे कोकणात येणार आहेत. यावेळी आवश्यक ती सर्व कागदपत्रे घेऊन गावात येणाचे त्यांनी चाकरमान्यांना सांगितले. सोशल डिस्टनसिंग पाळणे, मास्क वापरणे हे सर्व नियम पाळावे. हा सण हा उत्साहात साजरा करताना स्वतःची तसेच इतरांच्याही आरोग्याची काळजी घ्या. म्हणजे कोरोनाचा होणार प्रादुर्भाव आपण टाळू शकतो असेही ते म्हणाले.