रायगड- मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या कोरोना महामारीमुळे लग्नसोहोळ्याशी संबंधित व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याबाबत जिल्ह्यातील मंडप, डेकोरेटर्स, फोटोग्राफर, कॅटरर्स संघटनेने आज जिल्हाधिकारी निधी चौधरी याना भेटून मंगलकार्यालयात ५०० व्यक्तींच्या उपस्थितीला परवानगी देण्यात यावी, असे निवेदन दिले.
मार्च महिन्यापासून लग्नसोहळा हंगाम सुरू होतो. लग्न सोहळ्यानिमित्त मंडप, डेकोरेटर्स, फोटोग्राफर, केटरर्स, डीजे, साउंड सिस्टम व्यावसायिकांना काम मिळते. मे महिन्यापर्यंत लग्न सोहळा हंगाम असल्याने व्यासायिकांना चांगला आर्थिक फायदा होत असतो. मात्र, मार्च महिन्यात व्यावसायिकांना कोरोनाचे ग्रहण लागले. कोरोना महामारी सुरू झाल्याने ठरलेली लग्ने रद्द झाली होती. तर, काहींनी लग्न पुढे ढकलले. त्यामुळे, लग्न सोहोळ्याशी निगडित असलेल्या व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.
शासनाने टाळेबंदीत शिथिलता आणल्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. मात्र, ५० व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न सोहोळा पार पाडण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे, मंडप, डेकोरेटर्स, फोटोग्राफर, केटरर्स, डीजे व्यावसायिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शासनाने लग्न सोहोळ्यात ५०० व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी व्यावसायिकांकडून होत होती. त्यामुळेच, आज जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन देण्यात आले.
जिल्ह्यातील साडेपाच हजार व्यावसायिक आर्थिक विवंचनेत
रायगड जिल्ह्यात लग्न सोहोळ्याशी निगडित साडेपाच हजार व्यावसायिक आहेत. मार्चपासून ऑक्टोबरपर्यंत कोरोनामुळे हे सर्व व्यावसायिक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. घेतलेले कर्ज, कर्मचाऱ्यांचा पगार, घरातील घरखर्च कसा चालवायचा, असा प्रश्न या व्यावसायिकांना पडला आहे. त्यामुळे, शासनाने आमच्या या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून आम्हाला आर्थिक संकटातून मुक्त करावे, अशी मागणी शासनाकडे केल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
हेही वाचा- मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे येथे बर्निग कारचा थरार