रायगड - अलिबाग तालुक्यातील मांडवा समुद्र किनारी बॉम्बसदृश्य वस्तू मिळाल्याने एकच खळबळ उडाली होती. समुद्रावर सापडलेली ही वस्तू मोठ्या जहाजावर असलेली सॅटेलाईट (दिशादर्शक) असल्याचे बॉम्ब पथकाने निष्पन्न केल्याने नागरिकांनी निश्वास सोडला आहे.
मांडवा गावाच्या बाजूला असलेल्या बंदरात दुपारी बारा-साडेबाराच्या दरम्यान काही नागरिक समुद्र किनारी गेले असता बॉम्ब सदृश्य वस्तू किनाऱ्यावर पडलेली दिसली. त्यानंतर नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. या वस्तूबाबत नागरिकांनी मांडवा पोलीस ठाण्याशी संपर्क करून समुद्र किनारी बॉम्ब सदृश्य वस्तू वाहत आल्याचे कळविले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगून बॉम्ब पथकाला पाचारण केले.
अलिबाग येथून दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बॉम्ब पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी समुद्रातून आलेल्या वस्तूची पाहणी केली असता ती बॉम्ब नसून मोठ्या जहाजावर असलेली सॅटेलाईट म्हणजे दिशादर्शक असल्याचे निष्पन्न केले. मोठे जहाज मासेमारीसाठी समुद्रात गेल्यानंतर त्याची दिशा कळावी यासाठी जहाजावर सॅटेलाईट लावलेले असते. या सॅटेलाईटच्या माध्यमातून जहाज कुठे आहे याची माहिती मिळत असते.