रायगड - कारंजा येथून सकाळी चार वाजता अलिबाग वरसोली भागात मच्छीमारी करण्यासाठी आलेली मच्छिमार बोट वरसोली समुद्रकिनाऱ्यात बुडल्याची घटना आज सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये असलेल्या आठ कर्मचाऱ्यांनी लाईफ जॅकेट घालून, समुद्रात उडी मारून पोहत वरसोली समुद्र किनारा गाठला. त्यामुळे या आठही जणांचे जीव वाचले आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
सुरेखा राजेश नाखवा यांच्या मालकीची ही बोट होती. 'नमः शिवाय' नावाच्या या बोटीने वसंता पाटील, धावू तांडेल, गजानन जोशी, नितीन ठाकूर, उमाजी पाटील, रुपेश पाटील, नारायण कोळी, परशुराम पाटील या आठ जणांना घेऊन पहाटे चार वाजता करंजा बंदर सोडले.
बोट वरसोली बंदरातील खांदेरी व चाहूल खाद्या या दरम्यान आली असता अचानक बंद पडली. त्यानंतर बोटीला चालू करण्याचा प्रयत्न बोटीतील कर्मचाऱ्यांनी केला. मात्र, बोट सुरू झाली नाही. बोटीचा नांगर टाकला होता, मात्र पाण्याच्या हिसक्याने नांगरही निघून गेला. त्यानंतर, पाण्याच्या लाटेवर बोट पुढे जाऊन खडकावर आपटली आणि फुटल्यामुळे बुडू लागली. त्यानंतर, बोटीतील आठही जणांनी लाईफ जॅकेट घालून समुद्रात उडी मारली आणि बोटीतील मासे साठवून ठेवण्याच्या बॉक्सवर बसून बोयाच्या सहाय्याने आठही जण वरसोली समुद्र किनारी सुखरूप पोहचले.
या दुर्घटनेनंतर पोलीस, वरसोली ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांनी आठही जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. आता सर्व सुखरूप आहेत. मात्र बोट बुडल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.
मच्छीमारीला पावसाळ्यात बंदी घातली असताना व हवामान विभागाने पाच दिवस मच्छीमारांनी मच्छीमारीला जाऊ नये अशा सूचना असतानादेखील, मच्छिमार हे मच्छीमारीला जात आहेत. त्यामुळे आता या दुर्घटनेनंतर, या मच्छीमारांव काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.