पेण (रायगड) - खासदार सुनील तटकरे व महाविकास आघाडीच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांना बदनाम करण्याचे कट कारस्थान भाजपा करत आहे, ती बदनामी यापुढे कदापि सहन केली जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाअध्यक्ष सुरेश लाड यांनी पेण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी बोलताना सुरेश लाड म्हणाले, की पेणच्या मुख्याधिकारी यांच्या तक्रारीनुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गटनेते अनिरुद्ध पाटील व मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्यातील वाद न्याय प्रविष्ट आहे. या वादाचा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नाही. नेत्यांनी महिला अधिकाऱ्यांशी वागताना योग्यरीत्या वागावे. माता-भगिनींचा योग्य आदर राखावा, असाही सल्ला यावेळी लाड यांनी दिला. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी गुरुवारी पेण येथे बेकायदेशीरपणे काढलेला मोर्चा व घेतलेल्या सभे विरोधात पोलीस प्रशासन कारवाई करणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. यावेळी भाजपाच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांचा या पत्रकार परिषदेत निषेध करण्यात आला.
देवेंद्र फडवणीस हे राज्यात मुख्यमंत्री होते तसेच त्या वेळेला केंद्रातही भाजपाची सत्ता होती. तरीही देवेंद्र फडवणीस व भाजपाने पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना न्याय मिळवून दिला नाही. या संदर्भात खासदार तटकरे यांनी लोकसभेत आवाज उठवून सदरची बँक विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला आहे व त्यासाठी प्रयत्नशील आहेत. खासदार तटकरे यांची शैक्षणिक व राजकीय पात्रता काय आहे याची कल्पना संपूर्ण राज्याला आहे. त्यांची पात्रता जाणून घ्यायला भाजपाच्या नेत्यांना आयुष्य खर्ची करावे लागेल, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.
या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे सल्लागार बबन पाटील म्हणाले, की राज्यातील सत्ता हातातून गेल्याने भाजपाचे नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. हे नेते प्रकाशझोतात राहण्याकरिता महाआघाडीच्या नेत्यांवर खोटे व बिनबुडाचे आरोप करीत आहेत. महाआडीचे सरकार लवकरच पडेल अशी आरोळी ठोकतात. या भाजपाच्या वैफल्यग्रस्त नेत्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा, असे खुले आव्हान दिले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर बाटगा माणूस असल्याची अशी टीका बबन पाटील यांनी केली.
सुशांतसिंग राजपूत प्रकरण व मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगना राणौत या सिनेअभिनेत्रीला भाजपा व राज्यपाल यांनी साथ दिली. भाजपाचे दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांनी त्यावेळेला कंगना राणावत हिच्या वक्तव्याचा निषेध करायला पाहिजे होता. भारतीय जनता पक्षाचे नेते फक्त राजकारण करीत आहेत. कोरोनाच्या संकटात केंद्र सरकारने राज्य सरकारला कोणतीही मदत केली नाही. राज्य सरकारच्या हक्काचे जीएसटीचे कोट्यवधी रुपये आजपर्यंत देण्यात आले नाही.
जिल्हा परिषदेत शिवसेनेचे स्थान काय?
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना महाविकास आघाडीतील मुख्य घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला रायगड जिल्हा परिषदेतील सत्तेत शेकाप व राष्ट्रवादीने अद्याप सामावून न घेतल्याने शिवसेना नेत्यांमध्ये धुसपुस सुरू आहे.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड, शिवसेना सल्लागार बबन पाटील, काँग्रेसचे पनवेल शहर अध्यक्ष आर. सी. घरत, माजी आमदार मनोहर भोईर, माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे यांच्यासह राष्ट्रवादी, शिवसेेना व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.