रायगड - सर्वसामान्य जनतेच्या मनात सुशांतसिंह प्रकरणा संदर्भात अनेक शंका-कुशंका होत्या. त्यामुळेच या प्रकरणी सीबीआय चौकशीची अपेक्षा होती. सन्माननीय न्यायालयाने सीबीआय चौकशीला मान्यता दिल्याने आता 'दूध का दूध, पानी का पानी' होईल, अशी प्रतिक्रिया भाजपाचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली. रोहा येथे एका कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत कंपनीशी चर्चा करण्यासाठी आज ते रायगडला आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी साधला.
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकराणातील सर्व पुरावे सीबीआयला देण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. त्यामुळे जे जनतेला अपेक्षित आहे, तेच होईल. मुंबई पोलीस, बिहार पोलीस असो किंवा केंद्रीय तपास यंत्रणा असो, यांचा अंतिम उद्देश हा पारदर्शकपणे हे प्रकरण पुढे आणने आहे, असे दरेकर म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मुंबई पोलीस व बिहार पोलिसांमध्ये जो अनावश्यक वाद निर्माण झाले आहेत त्यालाही ब्रेक लागेल. सीबीआय चौकशीतून सत्यस्थिती देशातील जनतेच्या समोर येईल, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
दरम्यान, भाजपाच्या देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, किरीट सोमैया, राम कदम या नेत्यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांनी या प्रकरणी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.