नवी मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. त्याच महाराष्ट्रामध्ये आज महिला आणि मुली जीवंत जाळल्या जात आहेत. अजून किती मुली जीवंत जाळण्याच्या बातम्या येण्याची आणि किती बळी जाण्याची वाट राज्यकर्ते पाहणार आहेत, असा संतप्त सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. पनवेल तालुक्यातील शारदा माळी या महिलेच्या मृत्यूप्रकरणी चित्रा वाघ यांनी दुंदरे या गावी जाऊन मृत महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.
मंगळसूत्र चोरीला गेल्याचा वाद विकोपाला गेल्यानंतर महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. मात्र, महिलेला प्रथम जबर मारहाण करून जाळण्याचा प्रयत्न केला आणि फासावर लटकवून खून केल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. हा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. त्यानंतर चित्रा वाघ यांनी त्या महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन कुटुंबातील लोकांचे सांत्वन केले. त्याचबरोबर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांची भेट घेतली. संबधित घटनेतील आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
काय आहे पनवेलची संपूर्ण घटना? वाचण्यासाठी इथं क्लिक करा...
तपासामध्ये आम्ही काही गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच शवविच्छेदनात काही गोष्टी प्राप्त झालेल्या असून नातेवाईकांनीही संबंधित स्त्रीच्या मृत्यूच्या कारणावर संशय व्यक्त केला आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू केला असून पाचही फरार आरोपींना शोधण्यासाठी तीन पथक स्थापन केले आहेत. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असेही पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी सांगितले आहे.