रायगड : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज भारत बंदची हाक शेतकरी संघटनांनी तसेच राजकीय पक्षांनी दिली आहे. रायगड जिल्ह्यातही भारत बंदला राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मात्र सकाळच्या वेळेत जिल्ह्यातील बाजरपेठा सुरळीत सुरू आहेत. तर वाहतूक सेवाही सुरळीत सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात सकाळी भारत बंदला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. मात्र दुपारनंतर बाजरपेठा आणि सर्व व्यवहार बंद होण्याची शक्यता आहे.
बाजरपेठा, वाहतूक सुरळीत
जिल्ह्यात भारत बंदला पाठिंबा असला तरी सकाळी भाजी बाजार, किराणा दुकाने, फळविक्रेते, फुल बाजार, मच्छी बाजार हे सुरळीत सुरू आहेत. एसटी बस, रिक्षा, सितारा, जलवाहतूक या वाहतूक सेवा सुरळीत सुरू आहे. मात्र बंद असल्याने प्रवाशांचाही अल्प प्रतिसाद मिळत आहे.
भाजप सोडून सर्व राजकीय पक्षांचा भारत बंदला पाठिंबा
जिल्ह्यात शेकाप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे. जिल्ह्यात या चारही पक्षाची ताकद आहे. मात्र असे असले तरी सकाळी जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. त्यामुळे बंदला अल्प प्रतिसाद मिळाला आहे.
पोलिसांचा चोख बंदोबस्तभारत बंदची हाक विविध संघटनांनी दिली आहे. जिल्ह्यातही भारत बंदला पाठिंबा राजकीय पक्षांनी दिला आहे. त्यामुळे रायगड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या 3 तुकड्या (कर्जत, अलिबाग, महाड), मुख्यालय स्ट्राइकिंग 1,( माणगाव), खलापूर, पेण रोहा, श्रीवर्धन आणि नियंत्रण कक्ष येथे प्रत्येकी एक स्ट्राइकिंग फोर्स तैनात ठेवण्यात आली आहे. 250 पुरुष आणि 50 महिला होमगार्ड असा बंदोबस्त पोलिसांनी तैनात ठेवला आहे.