पनवेल - कळंबोलीत सोमवारी सुधागड हायस्कूलच्या समोरच्या मैदानात एका टाईम बॉम्ब आढळून आल्याने एकच खळबळ माजली होती. सोमवारी रात्री उशिरापर्यंत टाईम बॉम्बला निकामी करण्याचे काम सुरू होत. अखेर सात तासांच्या प्रयत्नानंतर बॉम्ब स्कॉडने हा बॉम्ब निकामी केल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, बॉम्ब सदृश वस्तू आढळल्यानंतर त्याची लिंक पनवेल शहरापर्यंत आल्याने अनेक चर्चेचे हादरे सुरू झाले आहेत. या घटनेचा कोणत्या घातपाताशी संबंध आहे का? याच्या चौकशीला वेग आला असून आता थेट एटीएस प्रमुख देवेन भरती यांनी मंगळवारी या घटनेचा आढावा घेतला आहे.
सोमवारी दुपारी एकच्या सुमारास कळंबोलीमधील सुधागड हायस्कुल समोर मैदानात एका हातगाडीवर सिमेंटच्या बॉक्समध्ये लाल रंगाचा बॉम्ब आढळून आला. या बॉक्समध्ये एक बॅटरी घड्याळाला जोडलेली पाहून तेथील एका सुरक्षारक्षकाने ही माहिती कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये कळवली. रात्री उशिरा हा बॉक्स उचलून खिडुकपाडा परिसरात नेऊन सीआरपीएफच्या मदतीने हा बॉक्स निकामी करण्यात आला. निकामी केलेल्या बॉक्सचे अवशेष फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी नेण्यात आले आहेत. मुंबई एटीएसची टीम या प्रकरणाच्या तपासासाठी पनवेलमध्ये दाखल झाली आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेने काल पासूनच आरोपींचा शोध सुरू केला आहे. काल रात्रीपासूनच कळंबोलीमधील तपास यंत्रणा कामाला लागली आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त तुषार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली विजय कादबाने, कोंडीराम पोपेरे यांच्यासह सर्व अधिकारी आणि त्यांचे पथक या तपास कामात लागले आहेत. मगंळवारी बाराच्या सुमारास एटीएस प्रमुख देवेन भारती कळंबोलीमध्ये दाखल झाले. कळंबोली पोलीस ठाण्यात पोलीस आयुक्त संजय कुमार आणि एटीएस प्रमुखांनी या घटनेचा आढावा घेतल्याचं समजते आहे.
रासायनीक विश्लेषण अहवालाकडे लक्ष -
चौकशीतून उजेडात आलेल्या माहितीची जुळवाजूळव करून सापडलेला शस्त्रसाठा, बॉम्ब आणि त्यांच्या संभाव्य वापराची ठिकाणे कोणती, कट शिजवण्याचा प्रयत्न होता का? याचा तपास एटीएस करत आहे. मात्र, बॉक्समध्ये काही शस्त्रसाठा जुळवून तो एका घड्याळाला जोडलेला होता आणि त्याला एकच्याला टाईम सेट करण्यात आले असल्याने तो बॉम्बच होता हे जवळपास स्पष्ट झाले आहे. मात्र, फॉरेन्सिक लॅबमधून आलेल्या अहवालानंतरच अधिकृत माहिती समोर येणार आहे.