रायगड - राज्यातील भाजप-शिवसेना युतीचे सरकार हे अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत जातीय तणाव वाढला आहे. मेक इन इंडियाचा बुरखा जनतेसमोर आला आहे. तर नागपूर शहर हे गुन्हेगारीचा अड्डा होताना दिसत आहे. समोरच्यावर टीका करणे विरोधकांना शोभते, सत्ताधाऱ्यांना नाही. हे भान 5 वर्षात मुख्यमंत्र्यांना येऊ नये, हे महाराष्ट्राचे दुर्दैव्य आहे, अशी जहरी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केली.
हेही वाचा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेची महाड येथे सांगता
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेची सांगता रायगड जिल्ह्यात महाड येथे झाली. महाड येथे सांगता सभेनंतर कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा - कोकण विभाग : सत्तेचा 'सोपान' असलेल्या कोकणात कोण मारणार बाजी ?
यावेळी कोल्हे म्हणाले, शिवस्वराज्य यात्रा राज्यातील 62 ते 65 मतदारसंघात फिरली. यावेळी जनतेमध्ये शिवसेना-भाजप सरकारविषयी प्रचंड नाराजी असल्याचे दिसले. रोजगार, शेतकरी, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल याबाबत लोकांमध्ये नाराजी आहे. 16 हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्याची कर्जमाफी फसवी असून पीकविमाबाबत शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी विमा कंपन्यांनीच शेतकऱ्यांना लुटले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात गुन्हेगारी वाढली आहे. जाती तणाव, बेकारी वाढली आहे. मेगाभर्ती होणार, असे सरकारने सांगितले होते. पण ती झालीच नाही. महापोर्टलचे काम ज्या कंपनीला दिले होते, ती घोटाळेबाज कंपनी आहे. त्यामुळे भरती ही संशयास्पद वाटत आहे. रोजगार, उद्योग संधी नाकारण्याचे काम या सरकारने केले आहे, अशी टीका कोल्हे यांनी केली आहे.