रायगड - भाजीपाला, किराणा, फळे, दूध, पेट्रोल व अन्य जीवनावश्यक वस्तूची खरेदी करण्यासाठी नागरिक रोज बाजारात जात असतात. यावेळी जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीवेळी व्यवसायिकांचा आणि कर्मचाऱ्यांचा नागरिकांशी संपर्क येतो. त्यामुळे व्यापारी वर्गाला आणि त्याच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते. त्या दृष्टीने व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व व्यापारी, भाजीपाला विक्रेते, दूध विक्रेते, पेट्रोल पंपचालक यांनी त्यांच्या व इतरांच्याही आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने स्वखर्चाने त्यांची स्वत:ची तसेच त्यांच्या दुकानामध्ये काम करीत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची अँटिजेन, आरटीपीसीआर टेस्ट तात्काळ करून घ्यावी, असेही आवाहन चौधरी यांनी केले आहे. त्याबद्दलची माहिती संबंधित नगरपालिका, नगरपंचायत मुख्याधिकारी व तहसिलदार यांच्याकडे द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
कोरोनाचा प्रादुर्भाव हा जिल्ह्यात काही प्रमाणात रोखला गेला आहे. मात्र गणेशोत्सव काळात बाहेरील जिल्ह्यातून, शहरातून चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. गणेशोत्सव सण हा कोकणात उत्साहात साजरा होतो. त्यादृष्टीने गणेशभक्त हे बाजारात खरेदीसाठी गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे किराणा स्टोअर, भाजीपाला, फळे, फुले दुकानात ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे व्यवसायिक आणि कर्मचारी यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. यासाठी व्यापारी आणि कर्मचाऱ्यांची अँटीजन तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्याकरिता जास्तीत जास्त बाधित व्यक्तीपर्यंत लवकरात लवकर पोहोचणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने शासनाने जास्तीत जास्त नागरिकांच्या अँटिजेन/आरटीपीसीआर टेस्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय जागतिक आरोग्य संघटना तसेच भारतीय आयुर्विज्ञान संस्थान परिषद यांच्याद्वारे देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुपालन तसेच शासनाच्या सूचनांप्रमाणे हँड सॅनिटायझरचा वापर, नाक व तोंडाला मास्क लावणे, फिजिकल डिस्टिसिंग पाळणे या बाबींचे देखील दैनंदिन जीवनात पालन करणे महत्त्वाचे आहे.