रायगड - कोरोनाचे महाभयंकर संकट जगावर घोंघावत असताना इतर राज्यात आणि जिल्ह्यांत अडकलेले नागरिक आपल्या गावी परतण्यासाठी धडपड करत आहेत. असेच मुरुड तालुक्यातील एक कुटूंब रसायनीमध्ये अडकले होते आणि ते पायी चालत अलिबागमध्ये दाखल झाले होते. या कुटुंबाला अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळ यांनी वाहनाने सुखरूप गावी रवाना केले.
कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर असल्याने अनेक परराज्यातील, राज्यातील, जिल्ह्यातील नागरिक हे इतर ठिकाणी अडकले आहेत. शासनाने या नागरिकांना गावी पाठविण्यासाठी सुरुवात केली आहे. मात्र, काहीजण आजही जाण्याची व्यवस्था होत नसल्याने अखेर आपले गाव गाठण्यासाठी पायी चालत निघाले आहेत.
मुरुड तालुक्यातील आदड या गावातील शैलेश गुंड यांचे कुटुंब लॉकडाऊनमुळे रसायनी येथे अडकले होते. आपल्या मूळ गावी येण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र यश येत नव्हते. अखेर 13 मे रोजी गुंड कुटुबांतील 5 महिला, तीन पुरुष आणि चार लहान बालके हे रसायनी येथून पहाटे साडेचार वाजता पायी चालत निघाले. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हे कुटुंब अलिबागमधील चेंढरे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एचपी पंपाजवळ थांबले होते.
याबाबत माहिती मिळताच काहींनी त्याठिकाणी जाऊन या कुटुंबाची चौकशी करून अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळ यांना संपर्क केला. त्यानंतर शेजाळ यांनी तातडीने या कुटुंबासाठी वाहनाची व्यवस्था करून त्यांना त्यांच्या गावी रवाना केले. याबाबतची माहिती सचिन शेजाळ यांनी मुरुड तहसीलदार यांना कळवली असून या कुटुंबाला गावात होम क्वारंटाईन केले जाणार आहे.