रायगड: राष्ट्रीय कॉंग्रेस नेते राहुलजी गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्र राज्यात नांदेड येथे दाखल झाल्यापासून रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत हे त्यांच्या शेकडो पदाधिकाऱ्यांसह भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. आज वाडेगाव ता.अकोला येथे भारत जोडो पदयात्रा आली असता राहुल गांधी यांना रायगड जिल्हा काँग्रेसच्या वतीने आगरी-कोळ्यांची मच्छिमार बोट भेट देण्यात आली आहे.
![Boat Gifted](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-rai-238-rahulgandhibet-slug-mhc10072_18112022150416_1811f_1668764056_1020.jpg)
जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी: यावेळी महेंद्र घरत यांना राहुल गांधी यांच्या सोबत 7 मिनिटे संवाद साधण्याची संधी मिळाली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले सोबत होते. त्यांनी स्व.बॅ.अंतुले साहेबांच्या रायगड जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी महेंद्र घरत यांच्या खांद्यावर दिली असल्याचे राहुल गांधी यांना सांगितले. तसेच जिल्ह्याध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर महेंद्र घरत यांनी रायगड कॉंग्रेसला नवसंजीवनी दिल्याचेही नाना पटोलेंनी राहुल गांधींना सांगितले आहे.
![Boat Gifted](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-rai-238-rahulgandhibet-slug-mhc10072_18112022150416_1811f_1668764056_126.jpg)
बोटीचा सन्मानपूर्वक स्वीकार: यावेळी रायगड जिल्हा कॉंग्रेस तर्फे वाडेगाव ता.अकोला येथे 17 नोव्हेंबर रोजी पदयात्रेच्या मार्गावर आगरी- कोळी नृत्याचे सादरीकर करण्यात आले आहे. राहुल गांधी यांनी याची दखल घेत कलाकारांना स्वतः हात करून जवळ बोलावून घेतले. यावेळी रायगड कॉंग्रेस तर्फे आगरी- कोळी समाजाचे प्रतिक म्हणून मच्छीमार बोट राहुल गांधींना भेट देण्यात आली. राहुल गांधींनी सदर बोटीचा सन्मानपूर्वक स्वीकार केला आहे.
रायगड जिल्ह्याचाच बोलबाला: काँग्रेस रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांच्यासोबत जिल्ह्यातील दोनशे कार्यकर्ते सोबत होते. आगरी कोळी नृत्याने पदयात्रेत नवचैतन्य निर्माण झाले होते. भारत जोडो पदयात्रेत त्या दिवशी रायगड जिल्ह्याचाच बोलबाला होता. यावेळी संपूर्ण महाराष्ट्राच्या काँग्रेस कार्यकर्त्यांकडून राययगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या वाडेगाव अकोला येथील पदयात्रेच्या नियोजनाचे कौतुक सुरू होते.