रायगड - मुंबईत कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे लॉकडाऊन असतानाही चाकरमानी अजूनही पायी चालत आपल्या गावी येत आहेत. असेच एक नालासोपारा येथून श्रीवर्धनकडे पती आणि मुलांसह पायी चालत येणाऱ्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे तिच्या लहानग्यांच्या डोक्यावरील छत्र कोरोनाच्या काळात हरवले आहे.
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील चाकरमानी हे कोरोनाच्या भीतीने गावी येण्यासाठी धडपड करीत आहेत. लॉकडाऊन असल्याने सर्व शासकीय वाहतूक सेवा बंद झाली आहे. कामधंदा बंद झाल्याने घरातील अन्नधान्य संपले आहे. अशा कठीण परिस्थितीत दिवस कसे काढायचे? असा प्रश्न या चाकरमान्यांपुढे उपस्थित झाला आहे. आपल्या गावी जाऊन तिथे मीठ भाकरी खाऊन आपल्या लोकांमध्ये राहू या हेतूने अनेक चाकरमानी यांनी पायी चालत आपले घर गाठत आहेत.
नालासोपारा पूर्व (जि.पालघर) येथून सलोनी देवेंद्र बांद्रे (वय 30) या पती देवेंद्र दत्ताराम बांद्रे व मुलांसह चालत आपल्या मूळ गावी म्हणजे श्रीवर्धन तालुक्यातील मारळ येथे निघाल्या. दोन दिवसरात्र भर उन्हात आणि रात्रीच्या वेळी रस्ता तुडवत हे कुटुंब बुधवारी (6 मे) दुपारी माणगावपर्यंत पोहोचले. थकलेला जीव, तापलेले ऊन यामुळे सलोनी यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्या चक्कर येऊन खाली कोसळल्या. त्यानंतर तातडीने त्यांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासले असता त्यांना मृत घोषित केले. याबाबत माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नालासोपारा ते श्रीवर्धन हे साधारण अडीचशे किलोमीटर अंतर असून श्रीवर्धनमधील मारळ हे गाव 40 ते 50 किलोमीटरवर असताना या महिलेवर काळाने घाला घातला. गावाच्या ओढीने आलेल्या या कुटुंबातील महिला अशा पद्धतीने भरला संसार सोडून गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.