रायगड - रमजान हा मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना. या महिन्यात मुस्लीम बांधवांसह बच्चे कंपनीही रोजे करून अल्लाहचे स्मरण करते. अशाच प्रकारे अलिबाग शहरातील साडेसात वर्षीय फुरकान इम्रान घट्टे यानेही पहिल्यांदाचा रोजे पूर्ण केले आहेत. त्याच्यासोबत अन्य ७ लहान बालकांनीही रोजे पूर्ण केले आहेत.
रमजान महिना हा पवित्र महिना असून अल्लाहचे स्मरण प्रत्येक मुस्लीम बांधव करीत असतो. मुस्लीम बांधव हा वर्षभरात केलेल्या कमाईचा काही भाग हा गोरबरीब लोकांना दान म्हणून या महिन्यात करीत असतो. त्यामुळे गरीब कुटुंबालाही आपला हातभार लावण्याचे पुण्य काम या महिन्यात मुस्लीम बांधकडून होत असते.
रमजान महिन्यात रोजे म्हणजे उपवास केले जातात. यामध्ये सूर्योदया पूर्वी व सूर्यास्त नंतर आपले उपवास सोडवायचे असतात. दिवसभर काहीही न खाता-पिता तसेच थुंकीही न गिळता कडक उपवास मुस्लीम बांधव करीत असतात. यामध्ये लहान मुलेही रोजे पकडत असतात. नऊ वर्ष पूर्ण झाल्यानंतर रोजे पकडले जातात.
अलिबागमधील फुरकान घट्टे या साडेसात वर्षीय मुलाने पहिल्यांदाच आपले रोजे ठेवले होते. रोजे पकडणे खूप चांगले आहे. सकाळी ४ वाजता उठून सैरी करून खात होतो. त्यानंतर नमाज करून आल्यानंतर दिवसभर काहीही न खाता सायंकाळी साडेसातनंतर उपवास सोडत होतो, असे फुरकानने यावेळी सांगितले. तर फुरकानसोबत त्याच्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या मुलांनीही आपले रोजे पूर्ण केले आहेत.