रायगड- खोपोलीतील राष्ट्रीय महामार्गावर शासकीय विश्रामगृहाजवळ ऑइल सांडून रस्ता निसरडा झाला होता. याठिकाणी एक भरधाव वेगात असलेली दुचाकी घसरून अनियंत्रित झाली आणि ती समोरच्या टेम्पोला धडकली. या अपघातात दुचाकी चालक तरुण ठार झाला आहे.
मंदार मंगेश यादव (वय 32, रा.साईबाबानगर खोपोली) असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. अपघातामध्ये त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा अपघात स्थळीच मृत्यू झाला. हा अपघात मुंबई-पुणे महामार्गावर शीळफाटा-खोपोलीदरम्यान शासकीय विश्रामगृहासमोर गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला.
मंदार हा सलूनचा व्यवसाय करीत होता. अपघाताची माहिती होताच खोपोली पोलीस, खोपोली अपघातांच्या मदतीसाठी सक्रीय गृपच्या सदस्यांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र अपघातग्रस्त युवक मंदार यादव याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मंदार यादवच्या अपघाती निधनाने खोपोलीत शोककळा पसरली आहे.