पुणे - प्रियकराने धारदार शस्त्राने प्रेयसीवर वार केल्याची घटना आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पिंपरी चिंचवडमध्ये घडली. यामध्ये प्रेयसी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तसेच हल्लेखोर प्रियकर विकास शांताराम शेटे (वय २३) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पीडित तरुणी शहरातील डांगे चौकातील एका रुग्णालयात काम करते. तिची आणि विकासची चांगली मैत्री होती. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र, विकास वारंवार तिच्याकडे लग्नाचा तगादा लावत होता. त्यावरून अनेकदा त्यांच्यात वाददेखील झाला. त्यामुळे पीडितेने त्याचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला होता. तसेच त्याच्याशी सर्व संपर्क तोडले होते. त्यामुळे विकास चिडला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संबंधित तरुणी आज रुग्णालयात कामावर जात असताना प्रियक तिचा पाठलाग करीत होता. त्याने मागून येऊन तिच्या पाठीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तरुणीला रुग्णालयात दाखल करून विकासला ताब्यात घेतले.