पुणे - दौंडमध्ये पूर्ववैमनस्यातून एका तरुणाच्या खून झाल्याची घटना समोर आली आहे. या तरूणाचा खून करून त्याचा मृतदेह मेरगळवाडी येथील रस्त्याच्याजवळील विहरीत टाकून दिला होता. कृष्णा आबु पिल्ले, असे या खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
हेही वाचा - मित्र झाले शत्रू! खंडणीसाठी अपहरण करून केला तरुणाचा खून
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 10 जानेवारीला रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घरात जेवण केल्यानंतर कृष्णा हा आईची दाड दुखत असल्यामुळे गोळी आणण्यासाठी शालिमार चौकात गेला होता. त्यानंतर तो उशिरपर्यंत घरी न आल्याने त्याचा भाऊ सुनिल आबु पिल्ले याने सव्वाअकरा वाजता कृष्णा यास फोन केला. परंतु, त्याने फोन कट केला. त्यानंतर कृष्णा यास फोन केल्यानंतर तो बंद लागला. यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारनंतर कृष्णाचा भाऊ आणि आई यांनी कृष्णाबद्दल चौकशी केली असता, त्यांना कृष्णाचे आणि तेजस उर्फ रोहन उर्फ कापस्या कांबळे याचे भांडण झाल्याचे समजले.
त्यावेळी कृष्णाचा भाऊ आणि आई पोलीस ठाण्यात गेले. त्यावेळी त्यांना पोलिसांनी त्यांना एका मुलाचा फोटो दाखवला. तो ओळखुन त्यांनी तो कृष्णा असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस त्या दोघांना मेरगळवाडी येथे एका विहरीजवळ घेवुन गेले. त्या ठिकाणी भरपूर लोक जमलेले होते. त्या ठिकाणी विहिरीच्या कडेला कृष्णाचा मृतदेह होता.
पोलिसांनी तेजस उर्फ रोहन उर्फ कापस्या कांबळे व त्याचे वडिल विजय संभाजी कापसे यांना ताब्यात घेतल्यानंतर तेजस उर्फ रोहन उर्फ कापस्या कांबळे याने कृष्णचा पूर्वीच्या भांडणावरून 10 जानेवारीला रात्री साडेअकराच्या दरम्यान लिंगाळी नगरपालिकेच्या पंपिग स्टेशनजवळ, वॉस्कॉन सोसायटीच्या पाठीमागे मोकळ्या जागेत त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे सांगितले. त्यानंतर तेथून त्याने व त्याचे वडिल विजय कांबळे यांनी त्यांच्या जवळच्या मोटार सायकलवरून मृतदेह मेरगळवाडी (ता. दौंड जि. पुणे) येथील रस्त्याजवळच्या विहिरीत टाकून दिला.
हेही वाचा - शेतामध्ये ड्रोनद्वारे होतेय औषध फवारणी; शेतीला नवीन तंत्रज्ञानाची जोड
याप्रकरणी कृष्णाचा भाऊ सुनिल आबु पिल्ले याने दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अरोपींना ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी हे करत आहेत.