पुणे- 29 वर्षीय तरुणास तब्बल पाच महिने अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याच्या बोरी साळवाडी या गावात घडला आहे. सावकाराने हे कृत्य केले आहे. याबाबत अज्ञात व्यक्तीने माणूसकीचे दर्शन घडवतं नारायणगाव पोलिसांना याची माहिती दिली. नारायणगाव पोलिसांनी तातडीने बोरी साळवाडी गावात जावून या व्यक्तीची सुटका केली. प्रवीण बबन जाधव, असे सुटका केलेल्या तरुणाचे नाव आहे.
हेही वाचा- देशाच्या उत्पादन क्षेत्रात मंदावली हालचाल; गेल्या दोन वर्षात 'पीएमआय'ने नोंदविला निचांक
प्रवीण यांनी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले होते. मात्र, प्रविण पैसे परत करु शकले नाहीत. त्यामुळे सावकाराने प्रविणयांना पाच महिने साळवाडी येथील एका बंद खोलीत दांबून ठेवले होते. नारायणगाव पोलीसांनी या प्रकरणी पाच जणांवरती गुन्हा दाखल केला आहे. अजित काळे आणि गौतम काळे या दोघांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे.
नेमके काय आहे प्रकरण-
प्रवीण यांनी गौतम काळे यांच्याकडून साडेचार लाख रुपये दरमहा 10 टक्के व्याजाने घेतली होती. याबद्दल गौतम काळे यांनी प्रविण यांची जमीन स्टॅम्प पेपरवर लिहून घेतली होती. काळे यांनी प्रविण यांच्याकडे वारंवार घेतलेल्या पैशाचा तगादा लावला होता. परंतु, प्रविण यांनी घेतलेली रक्कम न दिल्याने काळे कुटुंबाने प्रविण यांच्याकडे खरेदीखत करुन देण्याचा तगादा लावला होता. अखेर काळे कुटूंबीयांनी 31 मे 2019 रोजी नारायणगाव बस स्थानक येथून प्रविण यांचे अपरण केले. त्यांना साळवाडी येथील बंद खोलीत डांबून ठेवले. या प्रकरणाचा आता अधिक तपास नारायणगाव पोलीस करत आहेत.