पुणे - सासरच्या त्रासाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोखलेनगरमध्ये रविवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. निखिल धोत्रे (वय 29) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. राहत्या घरात बायकोच्या ओढणीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली.
पती-पत्नीत वाद -
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, एक वर्षापूर्वी निखिल आणि सोनाली यांचे लग्न झाले होते. सोनाली सध्या नऊ महिन्यांची गर्भवती आहे. बाळंतपणासाठी नाव कुठे नोंदवायचे यावरून दोघा पती-पत्नीत वाद झाला होता. दोन दिवसांपूर्वी सोनालीने टॉयलेट स्वच्छ करण्याचे हार्पिक पिल्याने तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी तिने चतु:शृंगी पोलिसात फिर्याद दिली असून मोबाईलवर का बोलतेस म्हणून पतीने मारहाण केली. तर दिराने हार्पिक हे टॉयलेट किलर पाजले असल्याचे तिने पोलिसांना सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी पती, दिरासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, रविवारी दुपारच्या सुमारास निखिल एकटाच घरी होता. सायंकाळ झाली तरी निखिल त्याच्या बेडरूम मधून बाहेर न आल्याने भावाने दरवाजा वाजवला तर त्याने उघडला नाही. त्यामुळे घाबरलेल्या भावाने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी निखिलने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.
हेही वाचा - इगतपुरी तालुक्यातील 18 वर्षीय तरुणीने घेतला गळफास; मोबाईलवर गाणे लावून संपवले जीवन
सुसाईड नोटमध्ये काय?
आत्महत्या करण्यापूर्वी निखिलने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आहे. त्यात त्याने "सासरच्या लोकांनी खूप त्रास दिला, त्यांच्यामुळे आपण कर्जबाजारी झालो आहे. माझ्या मृत्यूला ते जबाबदार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी" असे त्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे. तसेच या चिठ्ठीत त्याने आईला उद्देशून "आई तू काळजी करु नकोस, मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन, आई मी समजून माझ्या बाळाला सांभाळ, त्याची काळजी घे" असे लिहिले आहे. चतुशृंगी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.