दौंड : तालुक्यातील केडगाव हद्दीत अवैध रीतीने सुरू असलेल्या वाळु उपस्यावर यवत पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत यवत पोलिसांनी 3 ट्रक वाळूसह ताब्यात घेतले आहेत. जप्त केलेल्या या मुद्देमालाची एकूण किंमत 30 लाख रुपये आहे. तर, या अवैध वाळू उपसा प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली आहे.
9 जणांवर गुन्हा दाखल
अवैध वाळू उपसा प्रकरणी यवत पोलिसांनी 9 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यात, अमोल चौधरी (रा.नायगांव ता.हवेली, पुणे), राजेंद्र गायकवाड (रा.हडपसर, पुणे ), निखील माणिक मगर (रा.नायगांव ता.हवेली, पुणे ), अजिंक्य भाउसाहेब शेळके, आशिष शेळके (दोन्ही रा.शेळकेवस्ती केडगांव ता.दौंड) तसेच इतर तीन ट्रक चालक व एक जेसीबी मशीन चालक यांचा समावेश आहे.
सार्वजनिक ओढ्याचे नुकसान करून अवैध वाळू उपसा
याबाबत अधिक मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास केडगाव येथील मुळा-मुठा बेबी कालव्या जवळील सार्वजनिक ओढ्यात जेसीबी मशीनच्या साह्याने बेकायदा वाळू उपसा सुरू होता. याची माहिती यवत पोलीसांनी मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी तत्काळ पोलीस कर्मचारांचे पथक घेऊन येथे छापा टाकला. येथे ट्रक वाळू चोरी करताना पोलिसांना दिसले. मात्र पोलीस आल्याची चाहुल लागताच ट्रक आणि जेसीबी मशीन जागीच ठेवून चालक अंधाराचा फायदा घेवून पसार झाले.
30 लाखांचा मुद्देमाल जप्त
यानंतर पोलिसांनी एक जेसीबी मशीन, तीन वाळू वाहतूक करणारे ट्रक व त्यामधील अंदाजे साडेबारा ब्रास अशी प्रत्येकी 8 हजार रूपये प्रमाणे 1 लाख रूपयांची वाळू; असा एकूण 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सार्वजनिक ओढ्याचे व पर्यावरणाचे नुकसान करून वाळू चोरी केल्याप्रकरणी यवत पोलीसचे शिपाई विजय आवाळे यांनी यवत स्टेशनला फिर्याद दिली आहे. या नऊ जणांवर भा.द.वि.का.क.379, 34 व पर्यावरण संरक्षण कायदा व कलम 9,15,21, सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध अधि. 1984 कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - नियम मोडल्यास कार्यालय वर्षभरासाठी बंद, वाचा आजपासून काय सुरु काय बंद
हेही वाचा - वृद्ध कोरोनाबाधिताला ११ तासांनंतरही मिळाली नाही रुग्णवाहिका; अखेर...