पुणे - वृक्षासन, उत्कटासन, गरुडासन, अर्धवक्रासन अशा पाण्यातील विविध आसनांच्या सादरीकरणातून पुणेकरांनी व्यायामाचे महत्व पटवून दिले. शरीर सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम महत्वाचा असून आरोग्य चांगले असेल तरच मानसिक शांती लाभेल, असा संदेश देत अॅक्वा योगाद्वारे पुण्यातील डॉक्टर्स आणि विद्यार्थ्यांनी निरोगी जीवनाचा मूलमंत्र देऊन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.
श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टतर्फे जागतिक योग दिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर परिसरातील नांदे तलावात योगासनांचे सादरीकरण केले. डॉ. शीतल कोल्हे आणि डॉ. शिवाजी कोल्हे यांनी विद्यर्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले. पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीदेखील आसने घालून यावेळी योगदिन साजरा केला.
डॉ. शीतल कोल्हे म्हणाल्या, पारंपरिक योगाच्या प्रकारात थोडी आधुनिकता आणून पाण्यातील योगप्रकार केले जातात. पाण्यातील योगप्रकारामुळे सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी हे आजार बरे होतात. स्नायूंची लवचिकता वाढते तसेच याचा मानसिकदृष्ट्या देखील फायदा होतो.
प्रा. डॉ. राजेंद्र खेडेकर म्हणाले, ताण-तणाव आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात योग करणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थी दशेपासूनच योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे आणि त्यांनी दैनंदिन जीवनात दररोज योगासने करावी, यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. पाण्यामध्ये आसने करणे अवघड असते, हा प्रकार परदेशात प्रचलित आहे.