बारामती - कोरोना आजाराने आईचा मृत्यू झाल्यामुळे सांत्वनासाठी आलेल्या मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना बारामतीतील जळोची येथे घडली. मनिषा ठोंबरे असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
पायाला सर्पदंश झाल्याने मृत्यू -
कोरोनामुळे काही दिवसांपूर्वी बारामतीतील जळोची येथील आई सरुबाई बंडा ढाळे यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी त्यांची मुलगी मनिषा ठोंबरे इंदापूर तालुक्यातील रेडणी येथून जळोची येथे आल्या होत्या. शनिवार २२ मे रोजी सकाळी सातच्या सुमारास घराच्या परिसरात झाडलोट करत असताना त्यांच्या पायाला सर्पदंश झाला. त्यांना तत्काळ उपचाराकरता दवाखान्यात हलवण्यात आले. मात्र, शहरातील विविध रुग्णालयात बेड उपलब्ध न झाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत महिलेला तीन वर्षाची मुलगी व सहा वर्षांचा मुलगा आहे.
फरशीखाली आढळला साप -
दुपारी तीन नंतर घरातील कुटुंबीयांना वॉशिंग मशीन जवळ फरशी खाली साप जाताना दिसला. ग्रीन वर्ल्ड फाऊंडेशन संस्थेचे सर्पमित्र अमोल जाधवांना साप पकडण्यासाठी बोलावण्यात आले. सर्पमित्र घटनास्थळी पोहोचले व त्यांनी फरशीखाली लपलेल्या तीन फुटांचा इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा जातीचा विषारी साप मोठ्या शिताफीने पकडला. या सापाला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. वन कर्मचाऱ्यांनी विषारी सापाला निर्जन स्थळी निसर्गात सोडले.