पुणे- काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचे काम हे खासदार राहुल गांधीच करू शकतात, अशी प्रतिक्रिया माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली आहे. नेतृत्वाच्या मुद्यावरून काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडल्याचे चित्र आहे. काँग्रेसच्या २३ नेत्यांनी पत्राद्वारे पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे. त्यानंतर गांधी कुटुंबाशी निष्ठावान असलेले नेते सक्रिय झाले आहेत. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष बनवण्याची मागणी केली आहे.
याबाबत पुण्याचे माजी शहराध्यक्ष आणि लोकसभेचे उमेदवार मोहन जोशी यांनीही आपली भूमिका मांडली. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाचे नेतृत्व करावे, असे मत त्यांनी मांडले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप विरोधात राहुल गांधी हेच रस्त्यावर उतरून सत्याचा लढा देत आहेत. आणि आज काँग्रेसला अशाच नेतृत्वाची गरज आहे. पक्षाला एकजीव ठेवण्याची, बांधून ठेवण्याची क्षमता केवळ गांधी कुटुंबाकडे आहे आणि इतिहासातही हे अनेकदा सिद्ध झाले आहे, असे जोशी म्हणाले.
तसेच, सोनिया गांधी यांची जो पर्यंत इच्छा असेल तो पर्यंत त्यांनी अध्यक्षपद स्वीकारावे. मात्र, त्यानंतर देशात जर काँग्रेसचे नेतृत्व कोणाला करायचे असेल तर राहुल गांधी यांच्या शिवाय आम्ही दुसऱ्या कुणाचेही नेतृत्व मान्य कारणार नाही, अशी प्रतिक्रिया मोहन जोशी यांनी व्यक्त केली आहे.
थोरातांनीही केली होती मागणी
राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारले पाहिजे. त्यांची गरज केवळ पक्षासाठी नाही, तर देशासाठी आहे, अशी विनंती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधी यांना केली होती. राहुल गांधी यांचे नेतृत्व हे एक समर्थ नेतृत्व आहे. हेच नेतृत्व देशाला पुढे घेऊन जाणारे आहे. या देशाला तेच समर्थपणे नेतृत्व देऊ शकतात. यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व आणि अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी थोरात यांनी एका ट्विटच्या माध्यमातून आणि नंतर राहुल गांधी यांना एक विनंती पत्र पाठवून केली होती.
हेही वाचा- मुंबईने आणखी एक तज्ज्ञ डॉक्टर गमावला, डॉ. अजित चिखलीकर यांचे कोरोनाने निधन