दौंड (पुणे) - दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीस पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी पाटस गावातील पुणे-सोलापूर महामार्गलगत आहे. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास दत्त मंदिरानजिकची जलवाहिनी फुटून प्रचंड वेगाने पाणी पुणे सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर आले. सर्व्हिस रोडवर पाणीच पाणी झाले. या पाण्याच्या दाबामुळे दुचाकीस्वार पडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणावर पाणी येत असल्याने सेवा रस्त्यावरील वाहतूक काही काळ विसकळीत झाली होती. याबाबत कुरकुंभ औद्योगिक वसाहतीचे उपअभियंता यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.
हेही वाचा - एफडीए म्हणते, आता रेमडेसीविरचा पुरवठा सुरळीत
पाटस गावच्या हद्दीत कुरकुंभ औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा करणारी ७०० मिलीमीटर व्यासाची लोखंडी जलवाहिनी आहे. सदर जलवाहिनी सोनवणे वस्ती ते पाटस टोल प्लाझापर्यंत लोकवस्तीच्या व रस्त्याच्या कडेने आहे. तसेच, ही जलवाहिनी कुरकुंभ औद्योगिक वसाहत सुरू होताना टाकलेली असून ती गंजलेली आहे. तसेच, जलवाहिनीच्या कडेने घरांची संख्या वाढलेली आहे.
पाटस गावात कारखाना रोड ते टोल प्लाझापर्यंत रहदारी असून सदर जलवाहिनीच्या कडेला एक बसस्टॉप आहे. मागील काळात बसस्टॉपनजिक जलवाहिनी फुटून अपघात होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही जलवाहिनी वारंवार फुटत आहे. यामुळे ही पाटस गावाच्या हद्दीतील जलवाहिनी काढून त्या जागी नवीन जलवाहिनी टाकण्याची मागणी पाटस ग्रामस्थांच्या वतीने वेळोवेळी करण्यात आली आहे.
हेही वाचा - जळगावात चांदीसह सोने पुन्हा घसरले; आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री वाढल्याचा परिणाम