पुणे - पर्वतीजवळील जनता वसाहतीत पाण्याची तब्बल 18 इंच पाइपलाइन फुटल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. परिसरातील 40 घरांमध्ये पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेमुळे 9 जण जखमी झाले.
जनता वसाहतीतील गल्ली क्रमांक 29 या भागातून पुण्याला पाणीपुरवठा करणारी वहिनी गेली आहे. अचानक रात्री जलवाहिनी फुटल्याने परिसरातील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आणि यात 9 जण जखमी झाले. जखमी लोकांवर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले असून आता सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेलं असून नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्या पर्वती येथे बांधण्यात आल्या आहेत. त्याला पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून पुरवठा होतो. त्या टाक्या आधी भरल्या जातात आणि त्यातून पुणे शहराला पाणीपुरवठा केला जातो. डोंगरावरून पाणी येत असल्याने पाण्याला पुरेसा दाब येतो. या दाबामुळे जलोद्रेक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. या वसाहतीत अनेक गल्ल्या आहेत. या गल्यांमध्ये प्रचंड दाबाने पाणी घुसल्याने अनके घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान गल्ली नंबर 29मधील घरांचे झाले आहे.