शिक्रापूर (पुणे) - पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. यामुळे पुणेकरांना एक दिलासा मिळाला आहे. मात्र, त्याच दरम्यान पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाने अक्षरश: थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही आता कोरोनात मृत झालेल्या रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी 12 तासांपेक्षा जास्त वेळ वाट पाहावी लागत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून शिरूर तालुक्यातील शिक्रापूर हे गाव पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वाधिक रुग्ण वाढ होत असलेले हॉटस्पॉट गाव ठरत आहे. या गावात नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतरही अंत्यविधीसाठी बारा तासांपेक्षा अधिक वेळ वाट पाहावी लागत असल्याचा काहीसा प्रकार गुरुवारी सायंकाळी पाहायला मिळाला, दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा अंत्यविधी सुरू असताना रात्री उशिरा अजून एक कोरोना बाधित आणि एक नॅचरल मृत्यू झालेल्या रुग्णाचा अंत्यविधी याठिकाणी करायचा होता, परंतु आधीच दोन मृतदेह अंत्यविधीसाठी आलेले असताना या दोन मृतदेहांना अंत्यविधीसाठी शुक्रवार दुपारपर्यंत वाट पाहावी लागली. त्यामुळे नॅचरल मृत्यू होऊनही अशी परिस्थिती आहे. तर कोरोना बाधीत मृत्यू झाल्यानंतर किती वेळ वाट पाहावी लागत असेल याचा विचार न केलेलाच बरा, असे आता मृतांचे नातेवाईक सांगू लागले आहेत.
हेही वाचा - येवल्यातील कोरोनाची स्थिती, ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव