बारामती- इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव येथे काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ऊसाच्या फडात बिबट्यासदृश्य प्राण्याचे एक पिल्लू सापडले. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. मात्र वनविभागाच्या अधिका-यांनी पाहणी केल्यानंतर, ते मार्जार कुळातील अत्यंत दुर्मिळ असणा-या वाघाटीचे पिल्लू असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पिल्लाला वनविभागाने ताब्यात घेऊन सुरक्षीत अधिवासात सोडले.
काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बाभुळगाव येथील गोपीनाथ गुरगुडे यांच्या ऊसाच्या फडात एक बिबट्यासदृश्य प्राण्याचे पिल्लू आढळून आले. या संदर्भात त्यांचे पुतणे दीपक गुरगुडे यांनी त्या पिल्लाचे छायाचित्र काढून ते वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांच्याकडे पाठवले. काळे यांनी पुण्याचे वनसंरक्षक राहुल पाटील, सहाय्यक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे यांना ही माहिती दिली. वनसंरक्षक कार्यालयाच्या सूचनेनुसार काळे यांनी इंदापूरचे वनपाल राहुल गीते, बी.एस.खारतोडे व इतर ताफा बाभुळगावला पाठवला. पिल्लाची पाहणी केल्यानंतर ते पिल्लू वाघाटीचे असल्याचे वनअधिकाऱ्यांनी सांगितले.
तालुक्यात पहिल्यांदाच वाघाटीचे पिल्लू आढळले
हे पिल्लू अत्यंत दुर्मिळ अश्या वाघाटी जातीचे आहे. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या शेड्युल १ मध्ये वाघ, सिंह, हत्ती अश्या प्राण्याबरोबर वाघाटी जातीच्या प्राण्याचा समावेश आहे. इंदापूर तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच या जातीचे पिल्लू सापडले आहे. त्यांचे संरक्षण व संवर्धन होणे गरजेचे आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी यावेळी दिली.