पुणे - जिल्ह्यातील 649 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. 2 हजार 10 प्रभागांमधील 5 हजार 33 जागांसाठी 11 हजार 7 उमेदवार आपले नशीब आजमवणार आहेत. तर, जिल्ह्यातील 97 ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
देशाची मिनी संसद म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये गावकी-भावकीच्या राजकारणातून प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. गावकी, भावकी आणि नातेसंबंध असे विविध फंडे वापरत उमेदवारांनी प्रचाराची धुरा सांभाळली. आज (शुक्रवार) सकाळपासून मतदार मतदान केंद्रावर गर्दी करून आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. पुणे जिल्ह्यातील 14 लाख 58 हजार 367 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी 13 हजार चारशे 17 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्तात मतदान सुरू आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढणार -
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गाव-वाडी-वस्तीवरील प्रत्येक उमेदवार मतदान केंद्रावर दाखल व्हावा यासाठी प्रशासनाकडून जनजागृती करण्यात आली आहे. त्यामुळेच यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढणार असल्याची शक्यता आहे.