पुणे - मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजातील संघटनांकडून आंदोलनासाठी पुढील दिशा ठरवण्यासाठी प्रयत्न होत आहे. यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने नाशिकमध्ये नुकतीच बैठक झाली होती. दुसरीकडे, आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा समाजाची दिशा ठरवण्यासाठी शनिवारी (दि. 3 ऑक्टोबर) पुण्यात शिवसंग्राम संघटनेचे नेते आमदार विनायक मेटे यांनी मराठा समाजाची बैठक आयोजित केली होती. मात्र, नेत्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याने, आरक्षण स्थगित झाले, तरी मराठा समाजातील नेते व संघटना एकत्र येत नाही, हे दुर्दैव असल्याचे प्रतिक्रिया मेटेंनी दिली.
तसेच या बैठकीवरुन वाद ही निर्माण झाला आहे. मेटे यांनी समाजाच्या सोबत रहावे, वेगळे उद्योग करू नयेत, असे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचे म्हणणे आहे. नाशिक येथील छत्रपती संभाजीराजेंच्या उपस्थितीत राज्यस्तरीय मराठा समन्वयकांच्या बैठकीला विनायक मेटे उपस्थित नव्हते. त्यामुळे मेटे यांनी तिथे उपस्थित रहायला हवे होते. आता पुण्यातील ही बैठक मेटे यांची वैयक्तिक बैठक आहे, असे सांगून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक या बैठकीला उपस्थित राहिले नाही, असे धनंजय जाधव म्हणाले.
या बैठकीवेळी बोलताना मराठा समाजाचे आरक्षण स्थगित झाले तरी मराठा नेते संघटना एकत्र येत नाही, हे दुर्दैव आहे. आरक्षणासह इतर मागण्यांमध्ये सुसूत्रता यावी म्हणून सगळ्यांना बोलवले होते, असे मेटे म्हणाले.
हेही वाचा - दारू तस्करांचा 'असाही' कारनामा, जप्त केलेला कंटेनरच राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातून पळवला