पुणे - वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या संत तुकाराम महाराजांचा तुकाराम बीज सोहळा आज देहूसह भामचंद्र आणि भंडारा डोंगर येथे मोठ्या भक्तिभावात साजरा होत आहे. या दोन्ही डोंगरावर वारकरी, ग्रामस्थांनी अभंगवाणीतून तुकाराम बीज साजरी केली आहे. देहूप्रमाणेच भामचंद्र डोंगराच्या पायथ्याचा विकास व्हावा. मात्र, डोंगरावर कोणताही विकास करू नये, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
भामचंद्र डोंगरावर संत तुकाराम महाराजांनी 15 दिवसांची तपश्चर्या केली. त्यावेळी त्यांना विठ्ठलभक्तीचा साक्षात्कार झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हा भामचंद्र डोंगर शांतीचे प्रतीक म्हणून भामचंद्राला पवित्र डोंगर म्हणून मानतात. त्यामुळे या डोंगराला एक वेगळे महत्त्व आहे. आज तुकाराम बीज निमित्त ग्रामस्थांनी तुकारामांचे अभंग वाणी म्हणत तुकाराम बीज साजरी केली.
भामचंद्र डोंगर हा पवित्र डोंगर मानला जातो. त्यामुळे या डोंगराचे पावित्र्य टिकून राहण्यासाठी या ठिकाणी कुठल्याही ही सुविधा उपलब्ध करून दिल्या जाऊ नयेत, यासाठी स्थानिक नागरिक लढा देत आहे. पाणी व लाईट या दोन गोष्टी भामचंद्र डोंगरावर देण्यात आल्या आहेत. मात्र, या डोंगरावर सर्व सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या तर या डोंगराचे महत्त्व आणि पावित्र्य पुढील काळात नष्ट होण्याची भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली.
भामचंद्र डोंगराच्या पायथ्याला सर्व सुख सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. भामचंद्र डोंगरावर वृक्ष लागवड करावी. भामचंद्रावर येणाऱ्या प्रत्येक नागरिक व भाविकाने पावित्र्य जपावे, तरच खऱ्या अर्थाने भामचंद्राचा शाश्वत विकास होईल, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - कोरोना प्रभाव : 'त्या' कर्मचाऱ्यांना कंपनीत न येण्याचे आदेश द्या, आयटी कर्मचाऱ्यांची मागणी