पुणे Vikas Lawande On Sharad Pawar : आरक्षण प्रश्नाचे अभ्यासक प्राध्यापक नामदेव जाधव (Namdev Jadhav) यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) हे ओबीसी नेते नेते असून, त्यांच्या प्रतिज्ञापत्रात ओबीसी असा उल्लेख असल्याचं मत लेखक जाधव यांनी व्यक्त केलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे (Vikas Lawande) यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, नामदेव जाधव हा एक तोतया व्यक्ती असून ते राजमाता जिजाऊ यांचे वंशज नाहीत. ते प्राध्यापक नाहीत, एका शाळेत शिक्षक असताना त्यांनी तिथं घोटाळा केल्यानं त्यांना तेथून हाकलून देण्यात आलं आहे. अशी टीका लवांडे यांनी नामदेव जाधव यांच्यावर केली आहे.
...त्यामुळं कुठेही मराठा वंचित राहिलेला : ते पुढे बोलताना म्हणाले की, शरद पवार हे कोणत्याही एका जात समुहाचे नेते नाहीत. सर्व धर्म समभाव, जाती धर्म निरपेक्ष पुरोगामी विचारांचे लोकनेते आहेत. त्यांनी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असताना जे जे निर्णय तसंच धोरणं राबवली त्याचा फायदा मराठ्यांसह सर्वच जाती समुहांना झालेला आहे. महिला धोरण आणून महिलांना आरक्षण दिलं, त्याचा फायदा सर्व जाती समुहातील समस्थ महिलांना झालेला आहे. तसंच महाराष्ट्रातील औद्योगिकरण धोरण राबवून एमआयडीसी स्थापन केल्यामुळं सर्व जाती समुहातील लाखो तरुणांना रोजगार मिळालेला आहे. कर्जमाफी, शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन इत्यादी निर्णयाचा सर्व जाती समुहाला फायदा झाला आहे. त्यात कुठेही मराठा वंचित राहिलेला नाही. पवार यांनी कायमच विविध घटकांना आर्थिकदृष्ट्या मदत होईल असं धोरणं राबवलं आहे. मराठा समाजातील युवा वर्गाने शरद पवार यांच्या विरोधातील अपप्रचाराला बळी पडू नये.
सर्व जात समुहांना न्याय : मराठा समाजाला सुप्रीम कोर्टात टिकणारे आरक्षण मिळावे. ज्याला कायदेशीर आधार असेल ही मागणी आणि भूमिका राष्ट्रवादी पक्षाने कायमच घेतलेली आहे. केंद्र सरकारने जातवार जनगणना करुन मराठा, धनगर, मुस्लिम इत्यादी सर्व जाती समुहांना न्याय मिळवून द्यावा. ही मागणी कायमच संसदेत आणि बाहेरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेली आहे. काही वर्षापासून देशभरातून मागणी होत असताना जातीवार जनगणना करण्यास भाजपा का नकार देत आहे. याचं उत्तर मिळत नाही. महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा व ऐक्य टिकून राहावं तसंच सर्व जाती समुहांचे आर्थिक, शैक्षणिक आणि रोजगाराचे प्रश्न सुटावेत ही आमची भूमिका आहे, असं देखील यावेळी लवांडे यांनी म्हटलं आहे.
नामदेवराव जाधव यांच्या विरुद्ध तक्रार : समाजात तेढ निर्माण करणे तसंच शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी, नामदेवराव जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे स्थानिक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी कोथरूड पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जाधव यांनी अनेक व्हिडिओ तसंच मुलाखती प्रसार माध्यमांच्या मार्फत प्रकाशित केल्या होत्या. ज्यामध्ये त्यांनी मराठा समाजाला आरक्षण न मिळण्याचं कारण असल्याचा आरोप शरद पवार यांच्यावर ठेवला आहे. तसंच काही वादग्रस्त आणि टोकाची भूमिका घेणारे शब्दही वापरले आहेत. मराठा आणि इतर मागासवर्गीय समाज यांच्यामध्ये संघर्ष निर्माण करणारी अनेक वक्तव्ये केल्याचं, तसंच शरद पवार यांचं नाव वारंवार घेऊन अनेक बिनबुडाचे आरोप त्यांच्यावर केले आहेत.
हेही वाचा -
- Manoj Jarange Patil : दिवाळीत नेत्यांच्या घरी फराळाला गेल्यावर त्यांना 'हे' विचारा, मनोज जरांगे यांचं आवाहन काय?
- Desai On Sanjay Raut : "राऊतांना त्यांचेच खबरी एक दिवस अडचणीत आणतील"; - शंभूराज देसाई
- Sharad Pawar On Diwali : पवारांची दिवाळी! माणसांच्या आयुष्यामध्ये चढ-उतार येतात,संकटांना तोंड द्यावं लागतं - शरद पवार, पाहा व्हिडिओ