पुणे - गावच्या शिक्षणात अंगणवाडी ही अत्यंत महत्वाची यंत्रणा गावात असते. अंगणवाडीतील मुला-मुलींना, गावातील गर्भवती मातांना व स्तनदा मातांना पोषण आहार अंगणवाडीच्या माध्यमातून दिला जातो. (THR ची पॅकेट) हा आहार पौष्टिक असूनही तो चविष्ट नसल्याने व या पोषण आहाराचे महत्त्व व्यवस्थित न सांगितल्याने हा आहार अनेकवेळा खाल्ला जात नाही. या पार्श्वभूमीवर या पौष्टिक आहाराचे विविध पदार्थ बनविण्याची पाककला आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात पिंपरी येथे आयोजित करण्यात आली होती.
अंगणवाडीतील मुले-मुली, गर्भवती माता, स्तनदा माता यांनी हा आहार नियमित खावा, हा या स्पर्धेमागील हेतू होता. पुण्यातील एनसीएएस संस्था व स्थानिक स्तरावर किसान सभा व आदिम संस्था यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. हा पोषण आहार ज्या कुटुंबाना दिला जातो.त्या कुटुंबातील १६ महिलांनी या पाककला स्पर्धेत सहभाग घेतला व या कार्यक्रमाला एकूण ५० महिला व गावातील युवक उपस्थित होते.
यावेळी सहभागी महिलांनी या पोषण आहारापासून विविध चविष्ट पदार्थ बनविले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून नर्स वर्षा मावळे यांनी काम पहिले. उपस्थित महिलांना आहारविषयक मार्गदर्शनही केले. यावेळी या पाककला स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्या महिलांना सुंदर बॅग देऊन सन्मानित केले गेले, तर सहभागी महिलांना ही बॅग दिली गेली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती गावच्या सरपंच संगीता वडेकर, पोलीस पाटील गवारी, डॉ.अमोल वाघमारे आदी उपस्थित होते. या अनोख्या व अत्यंत महत्वपूर्ण उपक्रमाचे संयोजन कृष्णा वडेकर यांनी पुढाकार घेऊन केला. तर त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य सरपंचांनी केले. या उपक्रमाला सर्व सहकार्य पुणे येथील NCAS संस्था व किसान सभा यांनी केले.