पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री तसेच माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांच्या पार्थिवावर आज पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत साडेबाराच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्काराला केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, यांनी उपस्थित राहून श्रध्दांजली अर्पण केली.
मदन दास देवी यांनी अनेक नेते घडवले : मदनदास देवी यांचे सोमवारी पहाटे बेंगळुरू येथे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 70 वर्ष त्यांनी संघाच्या प्रचारासाठी काम केले. संघापासून ते भाजपपर्यंत राजकीय निरीक्षक म्हणूनही ते कार्यरत होते. विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री म्हणून काम करताना त्यांनी अनेक नेते घडवले आहेत. अरूण जेटली, अनंत कुमार, सुशील मोदी, शिवराज सिंग चौहान, धर्मेंद्र प्रधान, विनोद तावडे अशा अनेक भाजपाच्या नेत्यांनी त्यांच्याकडून समाजकार्य संघटनेचे शिक्षण घेतले.
वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार : आज पुण्यातील वैकुंठ समशानभूमीमध्ये मदनदास देवी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मोहन भागवत, दत्तात्रय होसबळे असे संघाचे प्रमुख नेते, त्याचबरोबर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली आहे. दुपारी 12.30 ला पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीच्या अग्निहोत्रामध्ये मदनदास देवी यांचे दहन करण्यात आले. यावेळी मोहन भागवत म्हणाले की, मदनदास देवी यांचे काम थांबणार नाही. त्यांनी समाजाला एक आदर्श घालून दिला आणि देशाला युवकांचे नेतृत्व देण्याचे काम केले.
अंत्यदर्शनासाठी गर्दी : अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची आणि अजित पवार यांची भेट झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचार प्रमुख मदनदास देवी यांचे निधन झाल्यानंतर पुण्यातील मोतीबाग कार्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
हेही वाचा -