पुणे - राजगुरुनगर जवळील चांडोली येथील नर्मदा हाऊसिंग सोसायटीच्या डकमधील चेंबरवर स्त्री जातीचे अर्भक आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नकोशी झालेल्या या मुलीचा मृत्यू झाला आहे. या प्रकारची एकाच आठवठ्यातील ही दुसरी घटना आहे.
एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना अतिशय ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. स्त्री अर्भकाला स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने तातडीचे उपचार मिळावे, यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या नकोशीचा आधीच जीव गेला होता.त्यामुळे अर्भकाचा मृत्यू कसा व कशासाठी झाला याचा तपास राजगुरुनगर पोलीस करत आहेत.
नवनवीन तंत्रज्ञानाच्या युगातही मनाला सुन्न करुन सोडणारी ही घटना आजच्या काळात घडत आहे. 'मुलगी वाचवा, देश वाचेल' असे नारे दिले जातात. मात्र, प्रत्यक्षात मुलगी नकोशीच होत चाललीय याकडे कोण आणि कधी लक्ष देणार यावर प्रश्नचिन्हच आहे.