पुणे - शिरुर तालुक्यातील वाघाळे येथे चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात रात्रीच्या सुमारास चारचाकी गाडी पडून काका-पुतण्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बापू बाळू रासकर (वय 35) आणि लक्ष्मण भानुदास रासकर (वय 35), अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही आण्णापूर येथील रहिवासी होते.
हेही वाचा - तिसऱ्या मजल्यावरून पडून ११ वर्षीय मुलीचा मृत्यू, दोन्ही किडन्या झाल्या होत्या निकामी
काल(14 जानेवारी) सकाळी चासकमानच्या डाव्या कालव्यात चारशे क्युसेस वेगाने पाणी आले आहे. लक्ष्मण व बापु हे दोघे रात्रीच्या वेळी कारमधून जात असताना अंदाज न आल्याने गाडी अचानक कालव्यात पडली. दरम्यान, कालव्यातील पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने दोघांनाही गाडीच्या बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. वाघाळे परिसरात काका-पुतण्याच्या मृत्युमुळे शोककळा पसरली आहे.