पुणे - पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात विक्रीसाठी आणलेले सहा पिस्तूल आणि १५ जिवंत काडतुसांसह आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यांना यश आले आहे. कार शोरूममध्ये काम करणारा बाउन्सर आणि परळी वैजनाथ येथे वसुलीचे काम करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा यात समावेश होता. शस्त्र पुरवणारा कालू हा मध्येप्रदेशचा आरोपी अद्याप पसार आहे.
हेही वाचा - धुळे जिल्ह्यात एटीएम फोडीचा अयशस्वी प्रयत्न, चोरटा रंगेहाथ पकडला
दोघा आरोपींकडून सहा पिस्तूल आणि जिवंत १५ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. बेकायदेशीरपणे विक्री करण्यासाठी त्यांनी पिस्तूलची खरेदी केली असल्याचे समोर आले आहे. गणेश मारुती साळी (वय २६, रा. जुनी सांगवी, ग्यानोबा उर्फ गोटू मारुती गित्ते (वय ३०, रा. नंदागौळ, ता. परळी, जि. बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी येथील 'लकी बेकरी'समोर एक व्यक्ती संशयीतरित्या थांबला असून, त्याच्याकडे पिस्तूल आहे. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून गणेश या आरोपीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आणि पिस्तुलासारखे दिसणारे लायटर आढळून आले. चौकशीत गणेशने परळी येथील ग्यानोबा याच्याकडून पिस्तूल आणल्याचे सांगितले.
पोलिसांनी परळी येथून ग्यानोबा याला अटक केली. ग्यानोबा याच्यावर विविध पोलीस ठाण्यात खून, दरोडा, खंडणी, जबरी चोरी, वाहन चोरी असे २३ गुन्हे दाखल आहेत. आरोपी ग्यानोबा याने कालू सिंग जसवंत सिंग (रा. सिंघाणा, ता. मनावर, जि. धार, मध्यप्रदेश) याच्याकडून पाच पिस्तूल, १५ जिवंत काडतुसे आणि एक गावठी कट्टा विकत घेतल्याचे सांगितले. त्यातील दोन पिस्तूल आणि दोन काडतुसे गणेश याला विकल्या. पोलिसांनी १ लाख ६४ हजार रुपयांचे सहा पिस्तूल आणि १५ जिवंत काडतुसे जप्त केले. आरोपी गणेश हा वाकड येथील एका कार शोरूममध्ये बाउन्सरचे काम करत होता. तर, आरोपी ग्यानोबा हा परळी वैजनाथ येथील एका फायनान्स कंपनीत वसुलीचे काम करत होता. शस्त्र पुरवणारा कालू हा अद्याप पसार आहे.