पिंपरी-चिंचवड (पुणे) - पोलीस आयुक्तालयातील देहूरोड पोलिसांच्या रेकॉर्डवरील दोन सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. एका गुन्हेगाराला दोन वर्षांसाठी तर एकाला सहा महिन्यांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी माहिती दिली आहे. तर खंडणी दरोडा विरोधी पथकाने दरोड्याचा गुन्ह्यातील आरोपीला अटक केली आहे.
रोहित उत्तम अलकोंडे (29, रा. गांधीनगर देहूरोड), जाफर मेहबुब शेख (28, रा. जामा मस्जिद चाळ, आंबेडकरनगर) अशी कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर दरोड्याच्या गुन्ह्या प्रकरणी लक्ष्मण बसवराज गाडेकर (22, रा. तळवडे) याला खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहित अलकोंडे हा देहूरोड पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर गंभीर दुखापत पोहोचवणे, दंगलकरुन वाहनांची तोडफोड करणे, सरकारी नोकराला इच्छापुर्वक दुखापत पोहचवणे, वेळोवेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे अशा प्रकारचे तीन गुन्हे दाखल आहेत. त्याच बरोबर सशस्त्र दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. लक्ष्मण बसवराज गाडेकर (22, रा. तळवडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा-विरोधी पथकाचे पोलीस चिखली परिसरात गस्त घालत होते. तेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांना यासंदर्भात माहिती मिळाली की, चिखली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सशस्त्र दरोड्याच्या गुन्ह्यातील फरारी आरोपी लक्ष्मण गायकवाड चिखली येथील तोरणा हॉटेलच्या मागे असलेल्या खाणीजवळ येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी खाणीच्या परिसरात सापळा लावला आणि आरोपीला ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - 'मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेला संसार शोधायला सुरूवात'