पुणे : रोहित टिळक म्हणाले, मंगळवार 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची 103 वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात होणाऱ्या सोहळ्यात पंतप्रधान मोदी यांना पुरस्काराने गौरविले जाईल. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्याहस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. पुरस्काराचे यंदाचे ४१ वे वर्ष आहे. सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
हे दिग्गज ठरले पुरस्काराचे मानकरी : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची वेळ लवकरच जाहीर केली जाईल. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. देशहितासाठी निःस्वार्थ बुद्धीने कार्यरत असलेल्या व्यक्तींना 1983 पासून या पुरस्काराने गौरविण्यात येते. आतापर्यंत एस. एम. जोशी, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, शंकरदयाळ शर्मा, बाळासाहेब देवरस, खान अब्दुल गफारखान, शरदचंद्र पवार, एन.आर. नारायणमूर्ती, जी. माधवन नायर, डॉ. कोटा हरिनारायण, राहुल बजाज, बाबा कल्याणी. ई. श्रीधरन, प्रा. एम.एस. स्वामीनाथन, डॉ. वर्गीस कुरियन यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गजांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
मोदींना पुरस्कार देण्यामागे ही कारणे : लोकमान्यांच्या चतुःसूत्रीत स्वदेशी हा महत्त्वाचा भाग आहे. 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी उद्योगांच्या प्रगतीला नवी दिशा दिली. लोकमान्य टिळक यांनी 'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे', अशी सिंहगर्जना केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशासन आणि विकासासाठी सुराज्याची व्यक्त केलेली गरज आणि त्यासाठी आखलेली धोरणे, हे त्याच दिशेने टाकलेले पाऊल होय. समाजातील गरीब, अतिगरीब, असुरक्षित आणि उपेक्षितांकरता सुराज्य आणण्यासाठी ते कार्यरत आहेत. आर्थिक, सामाजिक सुरक्षा, आरोग्य आणि सर्वांना घरे उपलब्ध व्हावीत, या धोरणांद्वारे पंतप्रधान मोदी यांनी मानव केंद्रित दृष्टीकोनातून विकासावर भर दिला आहे. त्यामुळे देशातील नागरिकांच्या जीवनात मोठे बदल झाले आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांनी घडविलेला गुजरातचा विकास सर्वांसाठी आदर्श ठरला.
पंतप्रधानांच्या या कार्यामुळे मिळणार पुरस्कार: आत्मनिर्भर भारत किंवा स्वयंपूर्णता यावर पंतप्रधान मोदी यांनी लक्ष केंद्रित केले आहे. ही काळाची गरज होती. आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी मोदी सरकारने विविध सुधारणा केल्या. यातून उद्योजक व्यावसायिकांना व्यवसाय करणे सोपे झाले. 'आत्मनिर्भर भारत' संकल्पनेद्वारा गुंतवणुकीला चालना मिळाली आहे. बौद्धिक हक्क संपदेचे रक्षण, उत्पादनासाठी पायाभूत सुविधांचा विस्तार यांसह अनेक घटकांमुळे प्रगतीचे नवे टप्पे पार करता येतील. २०१४ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा दहावा क्रमांक होता. आता त्याने पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. येत्या काळात ती आणखी उंची गाठेल. जोपर्यंत नागरिकांची नाळ संस्कृतीच्या मुळाशी जुळत नाही, तोपर्यंत कोणताही समाज फुलत नाही. तेच संस्कृतीचे काम नरेंद्र मोदी करत आहेत. त्यामुळे त्यांना यावर्षीचा हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुरस्कारासाठी कॉंग्रेसचा मोदींना विरोध : रोहित टिळक हे काँग्रेसचे एकावेळी पुणे विधानसभेचे उमेदवार होते. ते काँग्रेस पक्षात कार्यरतसुद्धा आहेत; परंतु हाच पूर्णपणे सामाजिक पुरस्कार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. याला स्थानिक काँग्रेसचा विरोध होण्याची शक्यता आहे. तशी माहिती सुद्धा मिळत आहे की, स्थानिक काँग्रेसने या संदर्भात वरिष्ठ काँग्रेसजणांकडे तक्रार केलेली आहे. मात्र, माझ्याकडे असली कुठलीही माहिती नसल्याचे रोहित टिळक यांनी स्पष्ट केले.