बारामती- अपघातग्रस्त ज्येष्ठ नागरिकाला दवाखान्यात घेऊन जाण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या तीन युवकांना वालचंदनगर पोलिसांनी अटक केली आहे. तेजस बाळासाहेब बच्छाव ( वय २१), ऋषिकेश सुनील चंदनशिवे( वय १९),अभिजीत राजेंद्र जाधव ( वय १९) दोघे राहणार बारामती, अशी अटक करण्यात आलेल्या लुटारू युवकांची नावे आहेत. लुटीची ही घटना इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील चिखली फाट्यावर गुरुवारी १२ नोव्हेंबरला घडली होती. या घटनेत एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.
२३ हजार ७५० रुपये किमतीचा ऐवज काढून घेतला होता-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतीश बबनराव टांकसाळे हे कामानिमित्त १२ नोव्हेंबरला अंथुर्णे गावात आले होते. संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास बारामतीकडे दुचाकीवरून जात होते. लासुर्णे गावाजवळील चिखली फाटा येथे अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस पाठीमागून धडक दिल्याने ते खाली पडून जखमी झाले होते. त्यानंतर वरील तिघेजण एका अल्पवयीन मुलाने टांकसाळे यांना दवाखान्यात घेऊन जाण्याचा बहाणा केला. त्यांना दवाखान्यात घेऊन जाण्याऐवजी आडमार्गावर नेऊन लुटले. टांकसाळे यांना दमदाटी करून रोख ७०० रुपये, १५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी व ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण २३ हजार ७५० रुपये किमतीचा ऐवज काढून घेतला होता.
आरोपींना ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी-
या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर अपहरण व जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी आरोपींना पोलिसांनी आरोपींना इंदापूर न्यायालयात हजर केले असता, त्यांना ३० नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. घटनेचा तपास वालचंदनगर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व उपनिरीक्षक प्रभाकर मुंडे करीत आहेत.