मुंबई : पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला. या घटनेत तीन जण गंभीर झाले आहेत. भरधाव वेगात असलेल्या ट्रकने कंटेनरला पाठीमागून जोरात धडक दिली. हा अपघात आज सकाळी सातच्या सुमारास झाला. यामुळे काही काळ मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची कोंडी झाली होती. अमोल झगडे, प्रशांत झगडे व अमोल खडके असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रक आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. महामार्गावरील दस्तुरी पोलीस चौकीजवळ पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रकने कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रकमध्ये असलेले चालक आणि इतर दोघे गंभीर जखमी होऊन ट्रकच्या केबीनमध्ये अडकून पडले होते. देवदूत बचाव पथक आणि महामार्ग पोलिसांना जखमींना बाहेर काढण्यासाठी कसरत करावी लागली.
जखमींना तत्काळ ओझर्डे येथील ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मार्गावरील अपघातग्रस्त वाहन महामार्गावरून हटवण्यासाठी महामार्गावर तासाहून अधिक वेळ लागल्याने मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची काही वेळ कोंडी झाली होती.
हेही वाचा - 'सारथी' बचावसाठी मराठा समाज संघटना आक्रमक, पुण्यात लाक्षणिक उपोषण