पुणे - शहरात कोरोनाची भीती कायम असली तरी काही दिलासादायक बाबीही समोर येत आहेत. गेल्या 60 तासात पुणे शहरात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. तरिही नागरिकांनी घरीच थांबावे, असे आवाहनही त्यांनी केले.
महापौर म्हणाले, पहिल्या दोन कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर आज (गुरूवारी) आणखी तीन रुग्णांच्या 14 दिवसानंतर टेस्ट निगेटिव्ह आल्या आणि त्यांना आता डिस्चार्जही देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहरातील 19 कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी 5 जणांना घरी सोडण्यात आले असून, 14 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 11 रुग्ण नायडू रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर इतर तीन रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती महापौरांनी दिली आहे.