पुणे - पुणे-सातार रस्त्यावरील खेड शिवापूरला कारमधून २ जिवंत बिबट्याची पिल्ले राजगड पोलीसानी पकडले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. बंगळूर येथून पुण्यातील कोंढवा परिसरात ते जाणार होते. या बिबट्यांच्या पिलांचे वय ३ महिने आहे. मुन्ना हबीब सय्यद (वय ३१), इरफाझ मेहमूद शेख (वय ३३), आयझ बक्षुलखान पठाण (वय ४०) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, राजगड पोलीस ठाण्याचे कर्मचारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ नाकाबंदी करीत असताना (एम एच १२, आर एफ १०००) ही इनोव्हा गाडी सातारा येथून पुण्याच्या दिशेने जात होती. पोलिसांना या गाडीविषयी संशय आल्याने त्यांनी गाडी थांबवून लायसन तपासत असताना वन्यप्राण्याचा आवाज आला. त्यानंतर पोलिसांची गाडीची झडती घेतली असता गाडीच्या डिक्कीत प्लास्टिक बास्केटमध्ये दोन बिबटे आढळून आले.
पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी हे बिबटे बंगळूरू येथून आणले होते आणि ते पुण्याला घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरून पोलिसांनी अटकेत असलेल्या आरोपींनी या बिबट्यांची शिकार करून त्यांची तस्करी करण्याच्या उद्देशाने त्यांची वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले. या सर्वांविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम (१९७२) २ (१६), ९, ३९, ५०, ५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.