बारामती- बर्ड फ्लूमुळे अनेक पोल्ट्री व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांना असे वाटते की नुकसान झाले की ते सरकारने द्यावे. परंतु यंदा सरकारच्या तिजोरीत १ लाख कोटींचा कर कमी आला आहे. केंद्राकडूनही ३० हजार कोटी रुपये कमी आले आहेत. बाकीचा ७० हजार कोटींचा कर मिळायला पाहिजे होता, तो मिळालेला नाही. असे असतानाही पुढे राज्य सरकारचा गाडा चालवायचा आहे. अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. ते बारामतीमध्ये एका कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
व्यवसायाचा विमा उतरवणे आवश्यक
यंदा कोरोना आणि बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोल्ट्री व्यावसायिकांनी व गोधन पालकांनी आपल्या व्यवसायाचा विमा उतरवणे आवश्यक आहे. बँका देखील व्यवसायाचा विमा असेल तरच कर्ज देतात असेही अजित पवार यांनी यावेळी म्हटले आहे.
प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी
कोरोना होऊन गेल्यानंतर पुन्हा कोरोना होत नाही. या भ्रमात राहू नका कोरोनाची लस घेतलेल्यांही कोरोना झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. कोरोना हा आजार नवा आहे. या आजारापासून कसे सुरक्षीत राहाता येईल, यावर संपूर्ण जगभरात संशोधन सुरू आहे. मात्र प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी, कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन देखील यावेळी अजित पवार यांनी केले आहे.
'दादा' आम्हाला लस कधी?
'दादा' आम्हाला लस कधी मिळणार उपस्थितांच्या या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की प्रथमतः कोरोनाची लस डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल होम, संरक्षण विभागाचे तिन्ही दलाचे अधिकारी, कर्मचारी, सैनिक, पोलीस यांच्यासाठी आहे. या लोकांनी कोरोनाबाधित रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम केले आहे. यांच्या एवढे काम आपण कोणीच केले नाही. त्यामुळे अजून मलाच लस मिळाली नाही, टप्प्याटप्प्याने ही लस सर्वांना मिळणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.