पुणे - शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेवर आज दुपारी दीडच्या सुमारास दरोडा पडला. भरदिवसा रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत बँक कर्मचाऱ्यांना मारहाण करत पाच दरोडेखोरांनी बँकेवर दरोडा टाकून २ कोटी किमतीचे सोने व ३१ लाख रुपयांची रक्कम लंपास केली. या घटनेमुळे शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करणार - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर
पिस्तुलचा धाक दाखवीत लुटले
पिंपरखेड येथे आज, २१ ऑक्टोबर रोजी दुपारी दिड वाजता पाच दरोडेखोर हातात रिव्हॉल्व्हर घेऊन महाराष्ट्र बँकेत घुसले. एक जण दरवाज्यात थांबला तर, चौघे आत केबिनमध्ये शिरले. त्यांनी मॅनेजर व रोखपाल यांना पिस्तुलचा धाक दाखवीत जिवे मारण्याची धमकी देत लॉकरच्या चाव्या घेतल्या. त्यानंतर तेथील सुमारे 2 कोटी रुपयांचे सोने व 31 लाख रुपये रोख, असा 2 कोटी 31 लाख रुपयांचा ऐवज पोत्यात भरून दरोडेखोरांनी वाहनातून पलायन केले. वाहनाला प्रेसचा मोठा बोर्ड लावण्यात आलेला होता. दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यांनी काळे जर्किंग डोक्यापर्यंत पूर्ण व तोंडाला मास्क लावल्याचे दिसून येत आहे.
पोलिसांनी केली नाकाबंदी
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींचा शोध घेण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. शिरूर जिल्ह्याच्या चारही बाजूने पोलिसांनी नाकाबंदी लावली आहे. दिवसाढवळ्या अशाप्रकारे जबरी चोरी झाल्याने पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - VIDEO : घरकाम करणाऱ्या 111 महिलांनी अनुभवली हवाई सफर