पुणे - स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळाला नवीन बस हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. काही दिवसांमध्ये सुमारे ९९० बसेस परिवहन महामंडळाला उपलब्ध होणार आहेत. मात्र, त्यांच्या पार्किंगसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध झालेली नाही.
यापूर्वी महामंडळाच्या बसेस रस्त्यावर पार्क करण्यात येत होत्या. मात्र, बसेसची संख्या वाढल्यामुळे पार्किंगचा प्रश्न अधिक गंभीर होणार असल्याचे चित्र आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरक्षित भूखंडांवर परिवहन महामंडळाच्या बस पार्क करण्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. मात्र, लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे वेळीच लक्ष न दिल्यास बस पार्किंगचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.