पुणे - जम्बो कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेली रुग्ण महिला अखेर सापडली. ही महिला पिरंगुटमधील तिच्या नातेवाईकांच्या घरी राहत असल्याचे आढळले. संबंधित महिलेला 5 तारखेलाच जम्बो सेंटरमधून डिस्चार्ज मिळाला होता. मात्र, तिच्या डिस्चार्जबाबत नातेवाईकांना कोणतीच माहिती नव्हती.
ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईने पोलिसात देताच या घटनेची मोठी चर्चा झाली होती. अखेर आज सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचा शोध लागला. या घटनेमुळे जम्बो कोविड सेंटरची नाहक बदनामी झाल्याची खंत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. तर, जम्बो हॉस्पिटलकडून व्यवस्थित कम्युनिकेशन न झाल्यानेच आमचे पेशंट बेपत्ता झाले होते, असा आरोप तिच्या नातेवाईकांकडून केला जात आहे.