मावळ (पुणे)- राज्यात झालेल्या अतिवृष्टीने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचप्रमाणे मावळ परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने भातशेतीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मावळ हा भातशेतीचे आगार म्हणून ओळखले जाते. येथील बहुतांश शेतकरी हा भाताची लागवड करत असतो. यंदा भाताचे पीक जोमात आले आहे. मावळ तालुक्यात तब्बल 12900 हेक्टरवर भाताची लागवड करण्यात आली आहे. मात्र, गेल्या 15 दिवसात झालेल्या अति मुसळधार पावसामुळे एकूण 1191 हेक्टर वरील भात शेतीचे नुकसान झाले आहे. यामुळे येथील शेतकरी मेटाकुटीला आल्याच पाहायला मिळत आहे.
भात शेतीसह इतर पिकांचे मोठे नुकसान 19 ते 22 जुलै दरम्यान मावळ तालुक्यात पावसाच्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत मावळातील सुमारे 1191 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. मावळ तालुक्यातील 2634 शेतकरी या अतिवृष्टीमुळे बाधित झाले असल्याचा नजर अहवाल मावळ तालुका कृषी विभागाने तयार केला असल्याची माहिती मावळ तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी दिली.
मावळमध्ये 2634 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका 1018 हेक्टर क्षेत्रावरील भात पिकांचे नुकसान-
मावळ तालुक्यात मागील आठवड्यात अतिवृष्टी झाल्याने संपुर्ण तालुका जलमय झाला होता. नदी नाल्यांना पूर आल्याने मावळातील जिरायती व बागायती शेती पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काळे काॅलनी विभागातील शेतकर्यांना या पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. भाताचे आगार असा लौकिक असलेल्या मावळ तालुक्यातील 2456 शेतकर्यांच्या 1018 हेक्टर क्षेत्रावरील भात पिकांचे या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. तसेच 46 हेक्टर क्षेत्रावरील भुईमूग पीक, 108 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, असा साधारण 1172 हेक्टर क्षेत्रावरील जिरायती पिकांचे अंदाजे 79 लाख 69 हजार 600 रुपयांचे नुकसान झाले आहे. तर बागायती क्षेत्रापैकी 17 हेक्टर क्षेत्रावरील ऊस, 2.30 हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला अशा अंदाजे 19.30 हेक्टर क्षेत्र असलेल्या 49 शेतकर्यांचे 6 लाख 61 हजार 500 रुपयांचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका या व्यतिरिक्त पावसाच्या पाण्यामुळे शेतातील माती व बांध वाहून जाणे, गाळ साचणे असे साधारण 246.35 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. याकरिता आवश्यक अनुदानाची मागणी अहवालात करण्यात आली आहे. मावळातील काळे काॅलनी विभागातील 834.30 हेक्टर, खडकाळा विभागातील 114 हेक्टर व वडगाव विभागातील 213 हेक्टर पिक क्षेत्र बाधित झाले आहे. तर काळे काॅलनी विभागातील 236 हेक्टर व खडकाळा विभागातील 10 हेक्टर क्षेत्रावरील माती वाहून जाणे, गाळ साचणे असे प्रकार घडले आहेत.मुसळधार पावसामुळे अवघी शेती वाहून गेली आहे. काय करावं, आम्ही..बारा महिने या शेतीत कुटुंब राबत आहे. मात्र, पाऊस आला आणि अख्खी जमीन वाहून गेली. सरकार मदत किती करेल? असा पण प्रश्न आहे. दरवर्षी 35 हजारांचा खर्च होतो. शेतीतून आता उत्पन्न मिळत नाही. अशी खंत शेतकरी सतू गवारी यांनी बोलून दाखवली आहे. यावर्षी दुप्पट पाऊस झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अवघ शेत वाहून गेल असून जमिनीचा कस गेलाय. शेतात केवळ दगड, राहिले आहेत. यावर्षी काही उत्पन्न पदरात पडेल अस वाटत नाही. अस महिला शेतकरी कुंदा मोरमारे यांनी सांगितलं